भारतातील उच्च शिक्षणात HECI : गरज की अनावश्यक पुनर्रचना?
हिवाळी अधिवेशन 2025 मध्ये संसदेत विकसित भारत शिक्षण अधिनियम (VBSA) विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय उच्च शिक्षण आयोग (Higher Education Commission of India – HECI) स्थापन करण्याबाबत देशभरात चर्चा सुरू आहे. या प्रस्तावानुसार, विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांचे विलीनीकरण करून एकच नियामक संस्था स्थापन करण्यात येणार आहे; मात्र वैद्यकीय व कायदे शिक्षणाचे नियामक यामध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत. UGC ही संस्था 1956 पासून भारतातील उच्च शिक्षणाचे नियमन करत असताना, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाकडे अपेक्षित लक्ष न दिल्यामुळे पुढे AICTE, NCTE आणि इतर क्षेत्रविशिष्ट नियामक संस्थांची स्थापना करण्यात आली. या संस्थांनी आपापल्या क्षेत्रातील विशेष गरजांनुसार गुणवत्ता राखणे व मानके निश्चित करणे यावर भर दिला. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) मध्ये उच्च शिक्षणातील मानकीकरण, नियमन, मानांकन (accreditation) आणि अर्थसहाय्य हे चार स्वतंत्र स्तंभ (verticals) HECI अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव आहे. यामागील उद्देश म्ह...